घातक

तुमची कष्टाची कमाई चोरीला जाणे दुःखदायक तर आहे पण घातक नाही..

आयुष्यात अपयश येणे नक्कीच दुःखदायक आहे पण घातक नाही..

प्रेमात विश्वासघात होणे, ह्रुदय पोखरले जाणे दुःखदायक तर आहे पण घातक नाही..

पदोपदी होणारी फसवणुक, नशिबाची नसलेली साथ दुःखदायक तर आहे पण घातक नाही..

एकटेपणाच्या गर्तेत.. निराशेच्या दरीत लोटले जाणे,भयाच्या छायेत..मरणाच्या पाशात जखडले जाणे, अतीव दुःखदायक आहे पण घातक नाही..नक्कीच नाही..

घातक असतं सर्वकाही सहन करणे..
घातक असतं स्वतः वरचा ताबा सुटने..
घातक असतं रोज ९ ते ५ च्या तालावर नाचणे..
घातक असतं तुमची धमक नाहीशी होणे..

तुमच्या स्वप्नांच मरण..लक्षात ठेवा..सगळ्यात जास्त घातक असतं…..

‘आकाशाशी जडले नाते’

प्रिय जयंत सर (श्री. जयंत विष्णू नारळीकर)   ,
आज तुम्ही पंच्याहत्तरी मध्ये पदार्पण करीत आहा..
तुमच्या विषयी बऱ्याच दिवसांपासून लिहायचं होत पण ते ह्या special  दिवशीच लिहिण्याचा योग आलाय..
…सर,तुमच्या खगोल ज्ञानाचे अफाट आकाश अगदी लहानपणापासून मला रुचायचे..कठीण कठीण खगोलीय प्रश्नांची सोप्या मराठी मधली तुमची लिखाणक्षमता अगदी अचंबित करणारी आहे..
मला अवकाशाची गोडी लागली ती केवळ तुमच्यामूळे..

तुमच्यातील वैज्ञानिक सर्वांना परिचित आहे पण मला भावतो तो तुमच्यातील लेखक.
आजतागायत तुमच्या लेखनाचा मी चाहता आहे, आणि  सदैव असेनही..
‘आकाशाशी जडले नाते’ मूळे जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत आणि आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत सचित्र देखण्या पानापानातून तुम्ही घडवलेली अवकाशाची सफर अगदी रोमांचित करते..

तुमची एक उत्कृष्ट लेखक म्हणून ओळख मला झाली ती ‘प्रेषित’ आणि ‘व्हायरस’ आणि तुमच्या इतर अगदी स्तंभित करून ठेवणाऱ्या लेखनामुळे..

लहान असतांना एकदा ‘आयुका’ मध्ये जाणे झाले होते..त्या आठवणी आजपण अगदी ताज्या आहेत..
‘ते’ सफरचंदाचे झाड अजूनही आठवते आणि अगदी त्याच दिवशी तुम्ही पुण्यात नव्हते हि गोष्ट अजूनही सलते..तुम्हाला भेटायची ती इच्छा एकदिवस जरूर पूर्ण होईल हि आशा..

तुम्ही आम्हाला खूप काही दिले ..तुमची साहित्याची देणगी खूप मोठी आहे आणि आज जर मराठी तरुण खगोल शास्त्राचा करिअर म्हणून विचार करत असेल किंवा जर विश्वाचे कोडे सोडवण्यासाठी त्याला काही प्रयत्न करायची इच्छा असे तर ते केवळ तुमच्यामुळे..
हा मराठी तरुण तुमचा आयुष्यभर ऋणी राहील..तुम्ही आमच्या साठी जणू  ‘यक्षांची देणगी’ आहात..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर .. येणारे अनेक वाढदिवस तुम्हाला आरोग्यपूर्ण लाभो..

जयतु जयतु जयंत !!!!Image

जेंव्हा मी तुझ्या प्रेमात पडतो

प्रिये,
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये जेंव्हा मी कविता म्हणून पाहतो,
नाजूक तुझ्या केसांच्या पाशात जेंव्हा मी स्वतःला गुरफटून घेतो,
तुझा हात हाती घेऊन जेंव्हा मी प्रेमाची ती रेषा जोडण्याचा प्रयत्न करतो,
त्याच क्षणी भास आभासाच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

कधी भांडणानंतर होणारा समेट जेंव्हा आपल्याला आणखी जवळ खेचतो,
निशब्द होणारा संवाद जेंव्हा शब्दांपेक्षा जास्त आपुलकीचा वाटतो,
हलकेच जेंव्हा तुझ्या बोटांच्या साच्यामध्ये मी स्वतःची बोटे अडकवितो,
त्याच क्षणी हृदयाच्या ठोक्यांच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

प्रत्येक भेटीमध्ये जेंव्हा आपण एकजीव होवून जातो,
कधी चोरट्या नजरेनी जेंव्हा आपले भाव एकत्र न्याहाळतो,
स्पर्शातला रोमांच जेंव्हा अंगावर शहारे आणतो,
त्याच क्षणी श्वास लयींच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

भावना उचंबळून जेंव्हा येतात,
हास्य आणि अश्रू जेंव्हा गर्दी करतात,
आणि जेंव्हा प्रत्येक ऋतूनंतर बंधने घट्ट होतात,
त्याच क्षणी पहिल्या पावसाच्या आणि पहिल्या वसंताच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….
मी तुझ्या प्रेमात पडतो….

जिमीन

काय सांगाव बापू मायावाल्या जिंदगानीचे किश्शे,
बिना रेशीचे पडले माया जीमिनीचे हिस्से.

घसा पडला कोल्डा हाल कुत्र बी इचारेना,
काजुन्का जीमिनीत काईच का पिकेना ?

पावसाचा नाई पत्ता अन पेरनी आली तिबार,
शावकर – सरकार मदी म्या दयलो गेलो पार.
सरकार हासत रायते ,शावकर रक्त पेत रायते,
आखरी कापूस पेरनाराच पुरा भोंगया होवून जाते.

तुकडे पडून, इकून इकून जिमीन होउन रायली गायब,
कास्तकाराचे हाल सुधारन असा म्हन्ते दिल्लीतला सायब.
इतल्या दुरून गप्पा हान्ते पन सायब इकड येत नाई,
भूकेपाई पाठी-पोटातला फरक भी आता सांगता येत नाई.

उरली सुरली जिमीन सरकार सेझ ले पायजे म्हन्ते,
त्याइले नाई म्हटल त लाईनवाले ताराचा खंबा लावतो म्हन्ते.

कधी कधी इख पिउन मारून जाव वाट्ते,
जिमीन इकापाई तिच्यात गाडून घ्यावं वाट्ते.
पन मराची भलतीच जिवाले धाक वाटत रायते,
त्या धाकाची बी कवाकवा लय शरम येत रायते.

इकड आड आन तिकड इर,मंग सोताचीच लाज येते,
आपलीच मोरी अनं आंग धुवाची चोरी म्हनत कास्तकार तसाच पडून रायते…..

वातकोंबड्याची भिरभिर

का कधी असे मन छळते ?

जणू गर्दीत एकले पडते.

प्रश्नांचा वारा येतो,अव्याहत तो वाहतो..

शहाण्यांच्या या जगात परी मी वातकोंबडा भिरभिरतो…..

प्रश्नांची सरबत्ती,उत्तरांची वानवा..

बोलक्या बाहुल्यांच्या जगात का मुक्याची उपेक्षा?

ग्लानी येउनी मग मी धडपडतो, यत्न करुनी उठू पाहतो..

परत तोच खेळ सुरु होतो,परी मी वातकोंबडा भिरभिरतो…..

यशाची चाहूल आणि अपयशाची हुरहूर..

कोऱ्या मनावर जणू भीतीचे काहूर.

अपेक्षांचे ‘तूप’ भरीवर भर पडते,

आयुष्याचे जणू ‘खांडववन’ होते..

मळभ दूर व्हावे म्हणून मी आक्रांत करतो ,

खिन्न होवुनी परी मी वातकोंबडा भिरभिरतो…..

चला बे खेळाले…

लहानपणी जे काही खेळ चालायचे (खासकरून विदर्भ पट्ट्यातील खेळ ), त्यांची सुरुवात किंवा ज्याच्यावर ‘राज्य’ आहे त्याला जे काही बोलायला लागायचं त्यांचा हा संग्रह.

१) लपा-छुपी [म्हणजेच विदर्भातील ‘रेष्टीप’ हो  🙂 ] :
धा..वीस …तीस ….चाळीस….पन्नास……साठ……सत्तर……अंशी…….नवद्द……..शंभर…..
लपा का छुपा रे बा….डबल राज्य देणार नाही………….

२)कुकूच कु [रिंगणात खूप सारे जण आणि ज्यावर राज्य तो बाहेर]:

बाहेरचा                                                              आतली मंडळी
कुकूच कु…                                                          किसका कु ?

राजाराम का बडा भाई….                                     कायको आया ?

खेल खेलने…                                                      कोनसा खेल ?

सूर कि मुंडी…                                                      किसकी मुंडी ?

आणि मग बाहेरच्या नि ज्याची ‘मुंडी’ सांगितली त्याला आपला जीव वाचवत रिंगणाबाहेर पडावे लागे.आणि मग असाच पुढे खेळ सुरु राही.

३)नदी की पहाड?:
कोरा कागज फिक्की शाई…..
अजून डाव आला नाही…..
सांग रे गड्या,सुई का दोरा ? (एक निवडायच)
गाय का वासरू? (एक निवडायच)
नदी की पहाड????   
आणि मग ज्यावर राज्य आहे तो सहसा नदी म्हणायचा ,बाकी सारे जण विरुद्ध दिशेच्या पहाडावर जाऊन सेटल होऊन जायचे..आणि मग नदी च्या मधातून एकामेकांच्या पहाडावर जायचं…अर्थातच नदीतल्या गड्या पासून जीव वाचवत…

४)गिल्ली-दांडू मधल अब्बक…दुब्बक…तीब्बक….हे तर वर्ल्ड फेमस आहे .

ह्या सर्व खेळांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे राज्य देणाऱ्याला निवडणे..अर्थात  ‘चकणे’ .
पाचात दोन किवा तीनात एक असे करत करत जो शेवटी उरेल तो राज्य देईल…
आजकाल मुल हि खेळ खेळतात कि नाही कुणास ठावूक…पण लहानपणी खूप मजा यायची,
विष-अमृत,हात्लाव्नी,लंगडी,बर्फ-पाणी ,चोर पोलीस च्या चिठ्या,लगोरी…आणि अजून बरेच काही…

तुम्हाला जर आणखी काही खेळ आठवत असतील,किवा त्यांच्या सुरुवात करण्याच्या पद्धती जर माहित असतील तर जरूर सांगा…

एक फोटो

एका सुंदर सकाळी सहज मामांकडे गेलो होतो.नेमके कारण म्हणजे मामांच्या छोट्या मुलीचा शाळेत जाण्याचा तो पहिला दिवस होता.तो क्षण काबीज करण्यासाठी मुद्दाम मित्राचा sony cybershot घेऊन गेलो.माझी धाटूकली मामेबहीण तर तिचे फोटो काढून घेऊन हौसेने शाळेला गेली.
मी घरी परत यायला निघालो तर सहज नजर अशोकाच्या त्या कठीण खोडाकडे गेली;हळूच एक इवलेसे नाजूक पान जणू डोकावून पाहत होते.नजर काही वेळासाठी स्तब्ध होऊन त्या पानाच्या हिमतीला दाद देत होती,आणि नकळत रुपित्रा मध्ये तो साठवून मी परत आलो…..

गुगल जरा वेंधळ झालंय ?

इतक्यात गुगल नी काय घोळ चालवलाय त्याचं त्यांना ठाऊक.पण यामुळे आमच्या सारख्या सर्वसामान्य इंटरनेट युसर्स चा गोंधळ होतोय ना…मान्य आहे बदल हा निसर्गनियम  आहे पण त्याला हि काही मर्यादा हव्या ना?

१)गुगल buzz बंद करणे : काहीही गरज नसताना buzz ची दांडी उडवली.काय तर म्हणे google+ ह्या त्यांच्या नवीन ‘गोगुल्या’ मुळे buzz ची गरज नाही.याचाच अर्थ काय तुम्ही १८ चे असाल तर google+ सोबत जोडून घ्या आणि १८ चे नसाल तर well,खोट वय दाखवून G+ ला जोडून घ्या.म्हणजे काही का होवो ना फेसबुक ला टक्कर द्यायचीच..पण त्यात बिचाऱ्या buzz चा बळी गेला ना राव !!!!

२)होम पेजस चा कचरा :हे तर जरा अतीच झाल .सगळ्यात आधी blogger चा इंटरफेस बदलवून जरा जास्तच पांढरा करण्यात आला.मग google च मेन होम पेज ते पण अश्याच बदलाचा बळी ठरल.सरतेशेवटी आमच्या आवडीच्या youTube ला पण यांनी सोडल नाही..काय किती छान इंटरफेस होता जुन्या youTube चा ,पण आता ह्या भरभरून tabs चा सूळसुळाट

३)भरभरून ‘किडे’ : सर्वसामान्य मनुष्य पण शोधू शकेल अश्या किड्यांचा (bugs) चा संचार वाढलाय. google च्या प्रत्येक सर्विस मध्ये (खासकरून gmail आणि youTube) bugs च प्रमाण वाढलाय.gmail च्या multiple sign-ins आणि youTube चे चुकीचे पेज views,addsense चे घपले हि त्यातलीच काही उदाहरणे.

आता हि ठरवण्याची वेळ आली आहे कि चला आपण bing वापरून तर बघू ….(सर्च आणि hotmail)
wordpress वापरूया …(blogging  साठी)
कसा आहे कोणावर किती अवलंबून राहावं हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे.पण google नि जरा लोकांचा दृष्टीकोन पण लक्षात घ्यायला हवा.simplicity सोडून जर google चकचकीत w w w कडे  वळत असेल तर  well , शेराला सव्वाशेर भेटतोच कधी न कधी…

खूप दिवसानंतर..

माझं जीवन एक बेट आहे,विशाल सागरात एकटच उभ असलेलं…दुराग्रही माझ मन वरवर थोड खट्याळ आहे,पण आतून अंतर्मुख असलेलं…आठवणी आहेत ‘शर’ समान,सफेद दगडांवर दिसून येणारी रेषा जशी नाहीशी होते अगदी तश्याच गुडूप झालेल्या…’आशा’ आहेत सुर्योदयासारख्या,जणू रोज नवीन आलोक घेऊन मार्गस्थ झालेल्या…

ह्या बेटावर खाचखळगे पुष्कळ ,आणि मित्र म्हणून फक्त संथ गतीने धावणारा वेळ.
मी फक्त समोर जातोय…पण हाच ‘वेळ’ कदाचित कट्टर शत्रू असावा,जो हे बेट सोडून खुल्या समुद्रामध्ये मला बुडी मारण्यास अटकाव करतोय..

मग मी मागे फिरतो ,पाहतो सभोवतालचा काळोख…रिकामा आणि गडद होत जाणारा…

मग अचानक डोळ्यांसमोरून तरळत जातात त्या गोड….गुलाबी…विविधरंगी…आनंदी आठवणी..
आणि मग अचानक उर येतो दाटून आणि डोळ्यात साठते क्षारयुक्त पाणी…

थांबा,मला….मला एक किरण दिसतेय ….
क्षितिजावर बहुदा तोच ‘आशेचा’ तांबूस गोळा उगवतोय….

छे..आता नक्कीच नाही…आता ह्या बेटावरून जाणे नाही…
कारण तोच सहस्त्ररश्मी मला खुणावतोय…..
तो दिवस पुन्हा येईल ….
‘आशा’ सोडू नको…..

एक होता कार्व्हर…

नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आणि भुईमूगांच्या शेंगाना सुद्धा.कुंद वातावरणामध्ये भाजलेल्या किंवा उकळलेल्या शेंगा म्हणजे जणू एक मस्त मेजवानीच.
पण कधी विचार केलाय ह्या दाण्यांची आपल्या समाजात ‘एन्ट्री’ कशी झाली? शेंगदान्यांचे आज हजारो उपयोग आपल्याला माहित आहेत किंबहुना शेंगदाणे आपल्या जीवनाचा एक भाग आहे हे म्हणणे पण उणे ठरणार नाही.
तुम्हाला माहित आहे फार फार वर्षांपूर्वी शेंगदाणे म्हणजे डुकरांचे खाद्य हि एकच ओळख होती.पण रात्री नंतर ज्या प्रमाणे तेजोमय सूर्योदय होतो त्या प्रमाणेच सन १८६४ साली जगात एका नव्या पर्वाचा उदय झाला,’जॉर्ज कार्व्हर’ हे त्याच नाव.
‘गुलामाचे पोर’ म्हणून जन्मलेल्या कार्व्हर यांनी शेंगदाणे हे मनुष्य खाद्य म्हणून समोर आणले.शेंगदान्यांचे हजारो शोध आणि फायदे त्यांनी जगासमोर आणले.
तुम्ही वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ वाचलंय?
काय म्हणता; नाही? तर मग नक्की नक्की म्हणून वाचा.मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे माझे सगळ्यात आवडते पुस्तक आहे.
फक्त कार्व्हर यांच्या शोधांसाठी नाही तर ‘जीवन जगण्याची कला’ कशी असावी याचे सार्थ दर्शन या पुस्तकामधून होते.हृदय पिळवटून टाकणारे जीवनपटल आणि खडतर गुलामाचे आयुष्य जगून सुद्धा फक्त मायभूमी आणि स्व:ताच्या समाजासाठी झटणाऱ्या एका अजब व्यक्तीची हि गोष्ट.
एक रात्रीत कार्व्हर घडले नाही,लहानपणी ऐकलेल्या एका वाक्याने त्यांचे जीवन पार बदलून टाकले,ते वाक्य होते
”तुला जे जे शिकता येईल ते तू जरूर शिक,नंतर जे तू शिकला ते आपल्या लोकांना शिकव”.फार थोड्या लोकांना हि विचारसरणी उमगते,पण ज्याला उमगली तो जगाचा कायापालट करून टाकतो.
धन्य तो शेंगदाणा आणि धन्य त्याचा संशोधक जॉर्ज कार्व्हर…