जेंव्हा मी तुझ्या प्रेमात पडतो

प्रिये,
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये जेंव्हा मी कविता म्हणून पाहतो,
नाजूक तुझ्या केसांच्या पाशात जेंव्हा मी स्वतःला गुरफटून घेतो,
तुझा हात हाती घेऊन जेंव्हा मी प्रेमाची ती रेषा जोडण्याचा प्रयत्न करतो,
त्याच क्षणी भास आभासाच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

कधी भांडणानंतर होणारा समेट जेंव्हा आपल्याला आणखी जवळ खेचतो,
निशब्द होणारा संवाद जेंव्हा शब्दांपेक्षा जास्त आपुलकीचा वाटतो,
हलकेच जेंव्हा तुझ्या बोटांच्या साच्यामध्ये मी स्वतःची बोटे अडकवितो,
त्याच क्षणी हृदयाच्या ठोक्यांच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

प्रत्येक भेटीमध्ये जेंव्हा आपण एकजीव होवून जातो,
कधी चोरट्या नजरेनी जेंव्हा आपले भाव एकत्र न्याहाळतो,
स्पर्शातला रोमांच जेंव्हा अंगावर शहारे आणतो,
त्याच क्षणी श्वास लयींच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

भावना उचंबळून जेंव्हा येतात,
हास्य आणि अश्रू जेंव्हा गर्दी करतात,
आणि जेंव्हा प्रत्येक ऋतूनंतर बंधने घट्ट होतात,
त्याच क्षणी पहिल्या पावसाच्या आणि पहिल्या वसंताच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….
मी तुझ्या प्रेमात पडतो….