जेंव्हा मी तुझ्या प्रेमात पडतो

प्रिये,
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये जेंव्हा मी कविता म्हणून पाहतो,
नाजूक तुझ्या केसांच्या पाशात जेंव्हा मी स्वतःला गुरफटून घेतो,
तुझा हात हाती घेऊन जेंव्हा मी प्रेमाची ती रेषा जोडण्याचा प्रयत्न करतो,
त्याच क्षणी भास आभासाच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

कधी भांडणानंतर होणारा समेट जेंव्हा आपल्याला आणखी जवळ खेचतो,
निशब्द होणारा संवाद जेंव्हा शब्दांपेक्षा जास्त आपुलकीचा वाटतो,
हलकेच जेंव्हा तुझ्या बोटांच्या साच्यामध्ये मी स्वतःची बोटे अडकवितो,
त्याच क्षणी हृदयाच्या ठोक्यांच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

प्रत्येक भेटीमध्ये जेंव्हा आपण एकजीव होवून जातो,
कधी चोरट्या नजरेनी जेंव्हा आपले भाव एकत्र न्याहाळतो,
स्पर्शातला रोमांच जेंव्हा अंगावर शहारे आणतो,
त्याच क्षणी श्वास लयींच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….

भावना उचंबळून जेंव्हा येतात,
हास्य आणि अश्रू जेंव्हा गर्दी करतात,
आणि जेंव्हा प्रत्येक ऋतूनंतर बंधने घट्ट होतात,
त्याच क्षणी पहिल्या पावसाच्या आणि पहिल्या वसंताच्या मध्यावर मी तुझ्या प्रेमात पडतो….
मी तुझ्या प्रेमात पडतो….

वातकोंबड्याची भिरभिर

का कधी असे मन छळते ?

जणू गर्दीत एकले पडते.

प्रश्नांचा वारा येतो,अव्याहत तो वाहतो..

शहाण्यांच्या या जगात परी मी वातकोंबडा भिरभिरतो…..

प्रश्नांची सरबत्ती,उत्तरांची वानवा..

बोलक्या बाहुल्यांच्या जगात का मुक्याची उपेक्षा?

ग्लानी येउनी मग मी धडपडतो, यत्न करुनी उठू पाहतो..

परत तोच खेळ सुरु होतो,परी मी वातकोंबडा भिरभिरतो…..

यशाची चाहूल आणि अपयशाची हुरहूर..

कोऱ्या मनावर जणू भीतीचे काहूर.

अपेक्षांचे ‘तूप’ भरीवर भर पडते,

आयुष्याचे जणू ‘खांडववन’ होते..

मळभ दूर व्हावे म्हणून मी आक्रांत करतो ,

खिन्न होवुनी परी मी वातकोंबडा भिरभिरतो…..

एक फोटो

एका सुंदर सकाळी सहज मामांकडे गेलो होतो.नेमके कारण म्हणजे मामांच्या छोट्या मुलीचा शाळेत जाण्याचा तो पहिला दिवस होता.तो क्षण काबीज करण्यासाठी मुद्दाम मित्राचा sony cybershot घेऊन गेलो.माझी धाटूकली मामेबहीण तर तिचे फोटो काढून घेऊन हौसेने शाळेला गेली.
मी घरी परत यायला निघालो तर सहज नजर अशोकाच्या त्या कठीण खोडाकडे गेली;हळूच एक इवलेसे नाजूक पान जणू डोकावून पाहत होते.नजर काही वेळासाठी स्तब्ध होऊन त्या पानाच्या हिमतीला दाद देत होती,आणि नकळत रुपित्रा मध्ये तो साठवून मी परत आलो…..

तु आणि पाऊस !

काल अचानक पाऊस बरसला.
वाटल,याच हे नेहमीचच…
कधीही केव्हांही येण,
त्रेधातिरपिट उडवून गोंधळ घालण…

पण या वेळीच्या पावसामध्ये काही गुपित दडले होते,
जणू राजरोसपणे त्याचे थंड थेंब चेहऱ्याशी लगट करत होते…

प्रेमाच्या या वर्षावासंगे भिजण्यास मीही तयार झालो,
तुझ्या आठवणींसोबत दंगेखोर पावसाशी मीही दंगा घालू लागलो…

पण..त्याने हे हेरले की तू इथे नाही,
आठवणींच्या फुलांसोबत त्याला काही देणेघेणे नाही…

मोक्याच्या वेळी तो पाठमोरा होऊन हळूच पळून गेला,
ऐन बहराच्या वेळी पानगळ देऊन गेला…

आता पाऊसही नाही…आणि आता गोंधळही नाही…
आता पाऊसही नाही…आणि आता गोंधळही नाही…
तुझ्या कोरड्या आठवणी घेऊन मी निशब्द उभा आहे…
तू कधी येणार? फक्त तुझीच वाट मी पाहतोय…
फक्त तुझीच वाट मी पाहतोय…