‘आकाशाशी जडले नाते’

प्रिय जयंत सर (श्री. जयंत विष्णू नारळीकर)   ,
आज तुम्ही पंच्याहत्तरी मध्ये पदार्पण करीत आहा..
तुमच्या विषयी बऱ्याच दिवसांपासून लिहायचं होत पण ते ह्या special  दिवशीच लिहिण्याचा योग आलाय..
…सर,तुमच्या खगोल ज्ञानाचे अफाट आकाश अगदी लहानपणापासून मला रुचायचे..कठीण कठीण खगोलीय प्रश्नांची सोप्या मराठी मधली तुमची लिखाणक्षमता अगदी अचंबित करणारी आहे..
मला अवकाशाची गोडी लागली ती केवळ तुमच्यामूळे..

तुमच्यातील वैज्ञानिक सर्वांना परिचित आहे पण मला भावतो तो तुमच्यातील लेखक.
आजतागायत तुमच्या लेखनाचा मी चाहता आहे, आणि  सदैव असेनही..
‘आकाशाशी जडले नाते’ मूळे जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत आणि आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत सचित्र देखण्या पानापानातून तुम्ही घडवलेली अवकाशाची सफर अगदी रोमांचित करते..

तुमची एक उत्कृष्ट लेखक म्हणून ओळख मला झाली ती ‘प्रेषित’ आणि ‘व्हायरस’ आणि तुमच्या इतर अगदी स्तंभित करून ठेवणाऱ्या लेखनामुळे..

लहान असतांना एकदा ‘आयुका’ मध्ये जाणे झाले होते..त्या आठवणी आजपण अगदी ताज्या आहेत..
‘ते’ सफरचंदाचे झाड अजूनही आठवते आणि अगदी त्याच दिवशी तुम्ही पुण्यात नव्हते हि गोष्ट अजूनही सलते..तुम्हाला भेटायची ती इच्छा एकदिवस जरूर पूर्ण होईल हि आशा..

तुम्ही आम्हाला खूप काही दिले ..तुमची साहित्याची देणगी खूप मोठी आहे आणि आज जर मराठी तरुण खगोल शास्त्राचा करिअर म्हणून विचार करत असेल किंवा जर विश्वाचे कोडे सोडवण्यासाठी त्याला काही प्रयत्न करायची इच्छा असे तर ते केवळ तुमच्यामुळे..
हा मराठी तरुण तुमचा आयुष्यभर ऋणी राहील..तुम्ही आमच्या साठी जणू  ‘यक्षांची देणगी’ आहात..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर .. येणारे अनेक वाढदिवस तुम्हाला आरोग्यपूर्ण लाभो..

जयतु जयतु जयंत !!!!Image

जिमीन

काय सांगाव बापू मायावाल्या जिंदगानीचे किश्शे,
बिना रेशीचे पडले माया जीमिनीचे हिस्से.

घसा पडला कोल्डा हाल कुत्र बी इचारेना,
काजुन्का जीमिनीत काईच का पिकेना ?

पावसाचा नाई पत्ता अन पेरनी आली तिबार,
शावकर – सरकार मदी म्या दयलो गेलो पार.
सरकार हासत रायते ,शावकर रक्त पेत रायते,
आखरी कापूस पेरनाराच पुरा भोंगया होवून जाते.

तुकडे पडून, इकून इकून जिमीन होउन रायली गायब,
कास्तकाराचे हाल सुधारन असा म्हन्ते दिल्लीतला सायब.
इतल्या दुरून गप्पा हान्ते पन सायब इकड येत नाई,
भूकेपाई पाठी-पोटातला फरक भी आता सांगता येत नाई.

उरली सुरली जिमीन सरकार सेझ ले पायजे म्हन्ते,
त्याइले नाई म्हटल त लाईनवाले ताराचा खंबा लावतो म्हन्ते.

कधी कधी इख पिउन मारून जाव वाट्ते,
जिमीन इकापाई तिच्यात गाडून घ्यावं वाट्ते.
पन मराची भलतीच जिवाले धाक वाटत रायते,
त्या धाकाची बी कवाकवा लय शरम येत रायते.

इकड आड आन तिकड इर,मंग सोताचीच लाज येते,
आपलीच मोरी अनं आंग धुवाची चोरी म्हनत कास्तकार तसाच पडून रायते…..

भगवद्गीता…

भगवद्गीता…साऱ्या जगाचे सार जणू आपल्याला भेट देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला केलेला उपदेश.भगवंतानी सांगितलेल्या त्या ज्ञानाचा उद्देश फक्त अर्जुनाला उपदेश करण्यासाठी नव्हता,तर अर्जुनाला माध्यम बनवून संपूर्ण मानवजातीला एक दिशा देणे,मानव संस्कृतीची घडी बसवणे हे भगवंताना त्यामधून सध्या करावयाचे होते.जेव्हां सामान्य मनुष्य संकटाना घाबरून किवा आपले कर्तव्य विसरून संकटाना पाठमोरा होतो तेव्हा हेच गीतेचे ज्ञान त्याला संकटाना सामोरे जाण्याची प्रेरणा देते.
सामान्यतः आजच्या घडीला आपण गीतेचे विविध पैलू ,जे कि विविध महान व्यक्तींनी आपल्या समोर मांडले आहेत त्यांचा अभ्यास करतो जसे कि वेद्व्यासांची ११ उपनिषदांपासून बनलेली ‘भगवद्गीता’..ज्ञानेश्वर महाराजांची ‘ज्ञानेश्वरी’..विनोबांची ‘गीताई’ …टिळकांचे ‘गीतारहस्य’..तर अगदी आताच्या काळातील Ranchor Prime यांची अनुवादित भगवद्गीता आणि डॉ. बालाजी तांबे यांचे गीतेवरील विवेचन आणि अजूनही बहुतायांचे गीतेवरील भाष्य.
पण शेवटी एकच सत्य समोर येते कि गीता कुठलीही असो सार एकच आहे.त्याचा मूळ घाभा एकच आहे तो म्हणजे कर्म आणि कर्मफळ.

आजचे युग कि जे अधोगतीकडे जात आहे त्यातून गीतेचे सारच आपल्याला तारू शकते.
गीताई माउली माझी,तिचा मी बाळ नेणता.
पडता रडता घेई ,उचलोनी कडेवरी.